shape
shape

नकार देण्यापेक्षा पार्टनरला संपवण्या मागचे मानसशास्त्र | मानवी वर्तन आणि मानसशास्त्र

  • Home
  • Health
  • Psychology
  • नकार देण्यापेक्षा पार्टनरला संपवण्या मागचे मानसशास्त्र | मानवी वर्तन आणि मानसशास्त्र

मानवी वर्तन आणि मानसशास्त्र – जेव्हा समाजात एखादी धक्कादायक किंवा दुर्दैवी घटना घडते, तेव्हा लोकांची पहिली प्रतिक्रिया बहुदा एकच असते: “ती व्यक्ती तर किती शांत आणि सुस्वभावी होती! अचानक तिचे डोके फिरले आणि सर्व काही संपले (He/She just snapped out of nowhere).”

आपली मुख्य प्रवाह माध्यमे (Mainstream Media) आणि सोशल मीडियावरील रील्स बनवणारे लोक याच कल्पनेला मोठ्या प्रमाणात खतपाणी घालतात. यामुळे सर्वसामान्यांना एक तात्पुरता मानसिक दिलासा मिळतो; एखादी चांगली व्यक्ती अचानक एका रात्रीत हिंसक किंवा बंडखोर बनू शकते, या कल्पनेने लोक स्वतःची समजूत काढतात. पण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास, माणसाचे मानसिक संतुलन, सदसद्विवेकबुद्धी किंवा भावनिक नियंत्रण कधीच ‘अचानक’ नष्ट होत नाही.

मानवी वर्तन आणि मानसशास्त्र

मानवी वर्तन हे नेहमीच ध्येय-प्रेरित (goal-directed) असते. लोकांना जे अचानक घडलेले टोकाचे वर्तन वाटते, तो प्रत्यक्षात त्या व्यक्तीने आयुष्यभर संघर्ष, ताण आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या हाताळताना वापरलेल्या चुकीच्या Coping Mechanisms चा (तडजोडीच्या पद्धतींचा) एक अंतिम आणि भयंकर विस्तार असतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड ॲडलर (Alfred Adler) यांच्या सिद्धांतांच्या आधारे आपण या मानसिकतेचा सखोल वेध घेऊ शकतो.

१. आल्फ्रेड ॲडलरचा ‘Style of Life‘ आणि ‘Private Logic’ सिद्धांत | मानवी वर्तन आणि मानसशास्त्र

ॲडलर यांच्या ‘Individual Psychology’ नुसार, प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट ‘Style of Life‘ (जीवनशैलीचा आंतरिक आराखडा) असते. हा आपल्या अंतर्गत नियमांचा, विश्वासांचा आणि संकटांना तोंड देण्याच्या पद्धतींचा एक अदृश्य पॅटर्न असतो, जो बालपणातच आकाराला येतो. या आराखड्याला चालवणारे एक ‘Private Logic’ (वैयक्तिक तर्कशास्त्र) असते, ज्याच्या आधारे व्यक्ती स्वतःचे निर्णय घेत असते.

जेव्हा एखादे मोठे संकट समोर उभे ठाकते, तेव्हा ती व्यक्ती अचानक कोणतेही नवीन व्यक्तिमत्त्व धारण करत नाही; तर ती आपल्या याच ‘Style of Life’ चा अतिरेक करते.

मानवी वर्तन आणि मानसशास्त्र
  • Evasive Problem Solving (पळवाट शोधण्याची वृत्ती): जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर लहान-मोठ्या संशर्षामधून पळ काढण्याची, अर्धवट सत्य बोलण्याची किंवा कटू प्रसंग टाळण्यासाठी खोटे बोलण्याची सवय असेल, तर मोठ्या संकटाच्या वेळी तिचे ‘Private Logic’ अचानक बदलत नाही. उलट, अशा वेळी ती व्यक्ती सर्वात मोठी आणि भयानक पळवाट शोधण्याचा प्रयत्न करते.
  • प्रश्नाचे निवारण विरुद्ध तो मिटवून टाकणे: एका अपरिपक्व किंवा अत्यंत आत्मकेंद्री मनासाठी, समस्येवर परिपक्वतेने चर्चा करणे (ज्यासाठी कुटुंबाचा रोष पत्करावा लागतो आणि अहंकाराला ठेच पोहोचते) मान्य नसते. अशा व्यक्तीच्या मते, समस्येचे ‘Resolution’ (निवारण) करण्यापेक्षा ती समस्याच (किंवा संबंधित व्यक्तीच) कायमची ‘Erase’ (मिटवून) टाकणे हा स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये परत जाण्याचा सोपा मार्ग वाटू लागतो.

२. वरवरची शांततेमागचे धोके आणि ‘Social Interest‘ चा मानसिक अभाव | मानवी वर्तन आणि मानसशास्त्र

ॲडलर यांच्या मते, मानसिक आरोग्याचा सर्वात मोठा निकष म्हणजे ‘Social Interest’ (सामाजिक जाणीव आणि सहकार्य करण्याची वृत्ती). टोकाचे वर्तनाची बीजे दैनंदिन जीवनात याच ‘Social Interest’ च्या अभावामध्ये आणि आपण लक्ष केलेल्या सूक्ष्म संकेतांमध्ये लपलेली असतात:

  • Social Interest चा अभाव: अशा लोकांमध्ये इतरांच्या भावनांबद्दलची खरी ‘Empathy’ (सहानुभूती) नसते. व्यवहारात ती व्यक्ती अत्यंत गोड बोलणारी आणि वरवर मदत करणारी दिसू शकते, परंतु जेव्हा स्वतःच्या सुखाचा आणि इतरांच्या गरजेचा प्रश्न येतो, तेव्हा ती कमालीची स्वार्थी बनते. यांच्यासाठी इतर माणसे म्हणजे केवळ त्यांच्या मार्गातील अडथळे किंवा स्वतःच्या फायद्यासाठी वापरायची साधने असतात.
  • ‘Passive Compliance’ आणि ‘Safeguarding Tendencies’: विरोधाभास असा आहे की, ज्या व्यक्ती निरोगी पद्धतीने संघर्ष हाताळू शकत नाहीत, त्या वरवर अत्यंत नम्र, शांत आणि आज्ञाधारक दिसतात. मानसशास्त्रात याला ‘Safeguarding Tendencies’ (स्वतःच्या अहंकाराचे रक्षण करण्याच्या क्लृप्त्या) म्हटले जाते. लहान किंवा कुटुंबातील मोठे निर्णय घेताना अशा व्यक्ती सहज होकार देतात, कारण यांच्यात ‘नाही’ म्हणण्याचे भावनिक धैर्य आणि ‘Assertiveness’ (सकारात्मक आक्रमकता) नसते. हा दबलेला राग आणि घुसमट आतल्या आत वाढत राहते आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा ते मन कोणत्याही थराला जायला तयार होते.

३. नियोजित कट (Premeditation) आणि क्षणाच्या रागातील फरक | मानवी वर्तन आणि मानसशास्त्र

नियोजित कट (Premeditation)क्षणाचा राग (Crime of Passion)
• यामध्ये पद्धतशीर नियोजन, जागा किंवा वेळ निवड आणि पूर्वतयारी समाविष्ट असते.• ती भावनिक उद्रेकातून किंवा तात्कालिक क्षोभातून अचानक घडणारे वर्तन.
• पुरावे नष्ट करण्याचा आणि स्वतःला वाचवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जातो.• कृतीनंतर बरेचदा प्रचंड पश्चात्ताप, भीती किंवा गोंधळाची स्थिती निर्माण होते.
• ही एक सजग विचारसरणी असते, जिथे स्वतःचा स्वार्थ आणि वासना ही इतरांच्या आयुष्यापेक्षा वरचढ ठरते.• तात्पुरती घडलेली चूक, सदसद्विवेकबुद्धी बिघडल्यामुळे अनपेक्षितपणे घडते.

जेव्हा एखाद्या घटनेत दीर्घकालीन नियोजन आणि पुरावे नष्ट करण्याचा पद्धतशीर प्रयत्न समाविष्ट असतो, तेव्हा तो ‘क्षणाचा राग’ असूच शकत नाही. हा बिघडलेला विवेक नसून, पूर्णपणे स्वार्थी बनलेली आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे झुकलेली विचारसरणी असते.

🎯 निष्कर्ष

पालक, शिक्षक आणि समुपदेशक म्हणून आपण आता मुलांच्या केवळ शांत आणि आज्ञाधारक असण्यावरून त्यांच्या मानसिक आरोग्याचा अंदाज लावणे थांबवले पाहिजे. वरवरची नम्रता हा एक सामाजिक मुखवटा असू शकतो; पण प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये आणि सहानभूती या मनाच्या खोल रचना आहेत.

मनाचे खरे मानसिक आरोग्य शांततेच्या काळात नाही, तर संघर्षाच्या काळात दिसून येते जेव्हा एखाद्या अपयशाचा धीराने सामना करायचा असतो किंवा स्वतःच्या चुकीची जबाबदारी स्वीकारायची असते. तरुणांमधील ही टोकाची प्रवृत्ती रोखायची असेल, तर आपल्याला घरामांमधून आणि संस्थांमधून ‘पळवाट शोधण्याच्या’ या मानसिकतेवर मुळापासून काम करावे लागेल.

आपल्या तरुण पिढीला हे शिकवावे लागेल की, तात्पुरती सामाजिक नाचक्की किंवा कुटुंबाचा रोष पत्करूनही ‘कडू सत्य’ बोलणे हे जास्त सुरक्षित आहे; कारण एक खोटे किंवा चूक लपवण्यासाठी तयार होणारा मानसिक दबाव पुढे चालून एखाद्या मोठ्या विनाशाला कारणीभूत ठरतो.

संवेदन गुरुकुल च्या माध्यमातून आमचा हाच प्रामाणिक प्रयत्न आहे की, तरुण-तरुणींना मानसिक दबावातून मुक्त करून, त्यांच्या भावनांचे योग्य व्यवस्थापन आणि प्रामाणिक संवादाचे धडे दिले जावेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *