एक कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट म्हणून माझा बराचसा वेळ लोकांशी ‘माइंडफुलनेस’ (सजकता) या विषयावर बोलण्यात जातो. पण जेव्हा जेव्हा मी हा विषय काढतो, तेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावर एक परिचयाचा भाव दिसतो त्यात थोडा अपराधीपणा आणि थोडा थकवा असतो. ते मला म्हणतात, “सर, मी पाच मिनिटं शांत बसायचा प्रयत्न केला, पण माझं डोकं शांतच होत नाही. हे माइंडफुलनेस वगैरे माझ्यासाठी बनलेलं नाहीये.”
जेव्हा मी हे ऐकतो, तेव्हा मी त्यांना माझं एक प्रोफेशनल सिक्रेट सांगतोः “असाच अनुभव मलाही येतो!”
आपल्याला माइंडफुलनेसची जी एक इमेज दाखवली गेली आहे ना, त्यानुसार आपण एखाद्या संगमरवरी मूर्तीसारखे शांत, स्थिर आणि जगापासून पूर्णपणे अलिप्त बसले पाहिजे. पण वर्षानुवर्षे ट्रेनिंग घेतलेला एक सायकॉलॉजिस्ट जेव्हा स्वतः ध्यानाला बसतो, तेव्हा नक्की काय होतं?
चला, आज तुम्हाला खरं काय ते सांगतो. गेल्या आठवड्यात मी डोळे बंद केले, एक मोठा, शांत श्वास घेतला आणि स्वतःच्या श्वासावर फोकस करायचा प्रयत्न केला. पण अवघ्या चाळीस सेकंदांत माझं मन ‘प्रेझेंट मोमेंट’ मधून सरळ भरकटलं- ‘आज जेवणात काय बनवायचं?’ इथपासून ते ‘अरे, मी ते एक काम करायचं विसरलोच!’ इथपर्यंत, आणि शेवटी तर तीन वर्षांपूर्वी कुणासोबत तरी झालेल्या एका ऑकवर्ड प्रसंगाच्या आठवणीत जाऊन अडकलं. जर माइंडफुलनेस म्हणजे मनाची पूर्ण शांतता आणि विचारांचा अभाव असणे अशी परीक्षा असेल, तर मी त्यात रोज नापास होतो!

Humor – The Missing Pillar
तुम्ही जर माइंडफुलनेसवरची पुस्तकं किंवा आर्टिकल्स वाचली, तर त्यात माइंडफुलनेसचे ९ मुख्य पिलर्स (9 Pillars of Mindfulness) सांगितले जातात:
- Non-judging (पूर्वग्रहविरहित वृत्ती),
- Patience (संयम),
- Beginner’s Mind (नवशिक्यासारखे मन),
- Trust (विश्वास),
- Non-striving (अवाजवी प्रयत्न न करणे),
- Acceptance (स्वीकार),
- Letting Go (सोडून देणे),
- Gratitude (कृतज्ञता) आणि
- Generosity (औदार्य).
हे नऊही पिलर्स अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचे आहेत, यात शंकाच नाही. आपल्याला स्वतःच्या विचारांची आणि भावनांची खरी ओळख करून देण्यासाठी, मनाची अस्थिरता कमी करण्यासाठी आणि वर्तमानात जगायला शिकवण्यासाठी हे पिलर्स एका भक्कम पायासारखं काम करतात.
पण स्वतःच्या आणि माझ्या क्लायंट्सच्या मनाचा अभ्यास करताना एक सायकॉलॉजिस्ट म्हणून मला नेहमी असं वाटतं की, या यादीत अजून एका अत्यंत महत्त्वाच्या पिलरचा समावेश असायला हवा, आणि तो म्हणजे: Humour (विनोदबुद्धी किंवा हलकेफुलकेपणा).
जेव्हा आपण आपल्या मनाला आणि विचारांना खूप जास्त सिरियसली घ्यायला लागतो, तेव्हा माइंडफुलनेस हे आपल्या रोजच्या कामाच्या यादीतील (To-do list) अजून एक ओझं बनून जातं.
आपण ताण कमी करण्यासाठी ध्यानाला बसायला जातो आणि उलट ‘मला शांत बसता येत नाहीये’ याच विचाराने स्वतःला अजून जास्त स्ट्रेस करून घेतो. हुशार आणि मॅच्युअर्ड ह्युमर(Humour) इथे संपूर्ण गेम बदलतो. आपल्या स्वतःच्या मनाचा हा अजब स्वभाव पाहून जेव्हा आपल्याला स्वतःवरच एक हलकंसं हसू येतं, तेव्हा खरी मॅजिक होते.
आपलं मन म्हणजे ना, एका अति-काळजी करणाऱ्या, सतत धावपळ करणाऱ्या लहान मुलासारखं असतं. ते सतत ओरडून सांगत असतं, “हे बघ, ही काळजी कशी वाटतीये?”, “बघ, ही जुनी आठवण आठवतीये?”, “अरे, ती तिकडे काय चमकतंय?” जर तुम्ही त्या लहान मुलाशी भांडायला गेलात, तर तुम्ही फक्त थकून जाल. पण जर तुम्ही त्या मुलाकडे बघून गोड हसून त्याची ती धडपड स्वीकारलीत, तर मनातली सगळी गुंतागुंत आणि ताण एका क्षणात नाहीसा होतो.
साधनेतला खेळकरपणा
‘संवेदन गुरुकुल’मध्ये आमचा असा विश्वास आहे की, मानसिक स्वास्थ्य किंवा वेलबींग म्हणजे स्वतःला कोणत्यातरी अवघड, कठीण चौकटीत अडकवणे नाही. उलट, तो तुम्ही स्वतःशी निर्माण केलेला एक सुंदर संवाद आहे. आणि विचार करा, थोड्याशा हास्याशिवाय आणि हलक्याफुलक्या क्षणांशिवाय कोणताही हेल्दी संवाद कसा काय पूर्ण होऊ शकतो?
माइंडफुलनेस म्हणजे विचारांना बळजबरीने स्टॉप करणे नव्हे; तर जेव्हा विचार मनात येतील (जे की येणारच आहेत!), तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता, हा दृष्टिकोन बदलणे होयः
- विनोदबुद्धी नसतानाः ‘माझं मन पुन्हा भरकटलं. मी किती अकार्यक्षम आहे. मला कधीच शांतता लाभणार नाही.” (यामुळे तुमची नर्व्हस सिस्टीम अधिक ताणतणावात जाते).
- विनोदबुद्धी असतानाः “अरे वा! मी इथे फक्त शांत श्वास घ्यायचा प्रयत्न करतोय आणि माझं मन मात्र विश्वाची गूढ रहस्यं सोडवायला निघालंय… क्लासिक ब्रेन !” (यामुळे नर्व्हस सिस्टीम लगेच रिलॅक्स होते).
ज्या क्षणी तुम्ही तुमच्या डोक्यातील या गोंधळावर हसू शकता, त्याच क्षणी तुम्ही जिंकलेले असता. कारण आता तुम्ही त्या विचारांच्या जाळ्यात अडकलेले नसून, त्यांच्यापासून थोडे लांब होऊन एक प्रेक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहत असता.
अपेक्षांचं ओझं कमी करूया…
त्यामुळे, जर तुमचं मन खूप गोंधळलेलं असतं, विस्कळीत असतं किंवा लगेच डिस्ट्रॅक्ट होतं म्हणून तुम्ही माइंडफुलनेसपासून लांब पळत असाल, तर आज मी तुम्हाला हे अगदी ‘बिनधास्तपणे’ आणि कसंही करण्याचं ऑफिशियल लायसन्स देत आहे !
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शांत बसार आणि तुमचं मन एखाद्या हास्यास्पद विचाराकडे धाव घेईल, तेव्हा स्वतःवर रागवू नका. पेशन्स आणि एक्सेप्टन्ससोबतच तिथे थोडा हुमर आणि खेळकरपणा आणा. चेहऱ्यावर एक छोटंसं हसू आणा, तुमच्या मनात सुरू असलेला तो विनोदी खेळ ओळखा, स्वतःला सांगा ‘ठीक आहे’ आणि पुन्हा हळूच स्वतःच्या श्वासाकडे परत या.
आपल्या आयुष्यात आधीच खूप गांभीर्य आणि कडक नियम आहेत; आपल्याला आता अजून गंभीर साधनांची गरज नाही. गरज आहे ती फक्त एक दीर्घ श्वास घेण्याची, स्वतःच्या विचारांपासून थोडे बाजूला होऊन पाहण्याची आणि माणूस म्हणून आपल्या मनाच्या या गोंधळलेल्या, पण रंजक स्वभावाचा आनंद घेण्याची!
श्रीधर कुलकर्णी
कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट (Counselling Psychologist)



