मुलांच्या ‘नाही’ मागचं मानसशास्त्र: एक पालक म्हणून काय करावे?
मुलांचे ‘नाही’ म्हणणेः एक डोकेदुखी की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास?
“नाही!” (No!)
दिवसभरात किती वेळा तुम्ही हे शब्द तुमच्या मुलांकडून ऐकता? अभ्यास कर “नाही!”, जेवून घे “नाही!”, आता मोबाईल ठेव – “नाही!”. एक पालक म्हणून आपला पहिला प्रतिसाद सहसा चिडचिड किंवा रागाचा असतो. हमारे जमाने में तो हम ‘नाही’ बोलने की हिम्मत भी नहीं करते थे, असं आपल्याला वाटतं. पण संवेदन गुरुकुलमध्ये काम करताना आम्हाला जाणवलं की, मुलांचे हे ‘नाही’ म्हणणे ही केवळ बंडखोरी (Rebellion) नाही, तर ते त्यांच्या वाढत्या आत्मविश्वासाचे (Confidence) लक्षण आहे.

१. ‘नाही’ म्हणणं म्हणजे नक्की काय?
आपल्याकडे मुलांनी मोठ्यांचे प्रत्येक शब्द मुकाट्याने ऐकले की त्याला ‘संस्कार’ मानले जाते. पण खरं सांगू? ज्या मुलाला स्वतःचे विचार मांडता येत नाहीत, ते मूल बाहेरच्या जगात सुरक्षित कसं राहणार?
- स्वतःची ओळख (Identity): जेव्हा मूल ‘नाही’ म्हणते, तेव्हा त्याला समजत असते की त्याचे स्वतःचे एक स्वतंत्र अस्तित्व आहे.
- सीमेची जाणीव (Boundaries): जर तुमचे मूल घरात तुम्हाला ‘नाही’ म्हणायला शिकले नाही, तर बाहेर मित्रमंडळींच्या चुकीच्या दबावाला (Peer Pressure) ते ‘नाही’ कसं म्हणणार?
२. ‘नाहीं’ म्हणण्यामागचे मानसशास्त्र (Psychology of ‘No’)
मुलांना ‘नाही’ म्हणून एक प्रकारचे नियंत्रण (Control) मिळवायचे असते.
- लहान मुलेः त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे असतात.
- टीनएजर्सः त्यांना त्यांची स्वतंत्रता (Independence) सिद्ध करायची असते.
खरं तर, जर आपण त्यांचा प्रत्येक ‘नाहीं’ रागाने दाबून टाकला, तर आपण त्यांचा भविष्यातील आत्मविश्वासच दाबत असतो.
३. पालकांसाठी माझ्या काही खास ‘गुरुकुल’ टिप्स.
मुलांच्या ‘नाही’ कडे दुर्लक्ष न करता किंवा न चिडता परिस्थिती कशी हाताळायची? हे ३ नियम लक्षात ठेवाः
- भावनेचा स्वीकार करा (Validate the Emotion): ओरडण्याऐवजी म्हणा, “मला समजतंय तुला आता खेळायचंय आणि खेळ थांबवणं कठीण आहे. परंतु, आता आपल्याला निघायला हवं.” त्यांच्या भावनेला महत्त्व दिलं की त्यांचा प्रतिकार कमी होतो.
- पर्याय द्या (Choice Hack): थेट आज्ञा देण्याऐवजी त्यांना दोन पर्याय द्या. “तुला अभ्यास आता करायचा आहे की १० मिनिटांच्या ब्रेकनंतर?” जेव्हा मुलांना वाटतं की निर्णय त्यांचा आहे, तेव्हा ते सहकार्य करतात.
- महत्त्वाच्या गोष्टी निवडा (Pick Your Battles): जर मूल टी-शर्टच्या रंगाला ‘नाही’ म्हणत असेल, तर चालू द्या. पण जर विषय सुरक्षिततेचा किंवा आरोग्याचा असेल, तर तिथे ठाम राहा. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याशी वाद घालू नका.
आज्ञाधारकतेपेक्षा, विचारी मुलांच्या घडणीला प्राधान्य द्या.

संवेदन गुरुकुलचा उद्देश केवळ ‘आज्ञाधारक’ मुले घडवणे हा नसून, ‘विचारी’ मुले घडवणे हा आहे. ज्या मुलाला आज घरात सन्मानाने ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्य मिळते, तेच मूल उद्या समाजात ताठ मानेने चुकीच्या गोष्टींना ‘नाही’ म्हणू शकते.
पुढच्या वेळी जेव्हा तुमचं मूल ‘नाही’ म्हणेल, तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा तुम्ही एका कणखर व्यक्तीला घडवत आहात!
तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मुलांच्या ‘नाही’ मुळे तुम्हाला कधी राग येतो का? तुम्ही तो कसा हाताळता? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा.
पालकत्वातील अशाच अनेक विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी संवेदन गुरुकुलच्या ‘चाईल्ड सायकॉलॉजी आणि पेरेंटिंग” या सेल्फ पेस कोर्सची माहिती घ्या.

भेट द्याः https://learn.sanvedan.com/s/pages/child-psychology-and-parenting-coach-certificate-course



