शेअर बाजार वाढला की हाव आणि पडायला लागला की घबराट ह्या सामान्य मानवी भावना आहेत.
ज्या आपल्याच देशात आहेत, असं मुळीच नाही मात्र इतर देशांच्या तुलनेत आर्थिक समजच भारतात तोळामासा आहे. कोणत्याही विकसित अर्थव्यवस्थेत 50% हुन अधिक लोकसंख्या ही शेअर बाजार, व त्या संलग्न गुंतवणुका करत असते.
भारतात हाच आकडा 4% ही नाही.
आपले लोक केवळ शेअर बाजार पडायला लागला की आपापल्या मनातल्या अज्ञानाने केवळ अफवा पिकवायला सुरवात करतात आणि अश्या अफवा ऐकून अनेक नव-गुंतवणूकदार, आम्हा आर्थिक सल्लागारांकडे भीतीयुक्त चित्र- विचित्र शंका घेऊन येतात, म्हणुन आज जरा त्यावर चर्चा करुयाच.
शेअर बाजार हा गेले 300 वर्षांपासून चालू असलेली व्यवस्था आहे, ज्या ब्रिटिश सरकारने आल्यावर राज्य केलं त्या ईस्ट इंडिया कंपानीचे भारतात राज्य करण्यापूर्वी पासून लंडन स्टोक एक्स्चेंजवर शेअर लिस्टेड होते.
ह्यावरून आपण अंदाज लावू शकतो, ही व्यवस्था किती जुनी आहे, आणि जाणत्या, आणि आर्थिकदृष्टया सजग गुंतवणूकदार लोकांसाठी शेअर बाजार हा पूर्वी पासून एक मुख्य पर्याय राहिला आहे. ह्या शेअर बाजाराचा वर खाली होत राहणे हा स्थायी भाव असून, तो केवळ वर आणि वरच जातो हा गैर समज आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीचा पहिला परिणाम होतो तो शेअर बाजारावर.
पण गंमत म्हणजे हा एकमेव बाजार आहे जिथे सेल लागतो आणि लोक बाजार सोडून पाळायला पाहतात..
वास्तविक 2 हजाराची वस्तू 500 रुपायात मिळत असेल तर बाजारात गर्दी करून विकत घेतली जाते पण शेअर बाजार असा एकमेव बाजार आहे जिथे लोक 500 ला आल्यावर ही घाबरत विकायलाकच उत्सुक असतात, कारण त्याचा भाव 2 हजार आहे तर का आहे?
तो 500 झाला तर काय असं झाल आणि का झाल? ह्याचा अर्थच मुळीच माहित नसतो, म्हणून फक्त घाबराट आणि हाव इतक्याच भावना शेअर बाजारा बाबत सामान्य माणसाच्या असतात. आज जरा त्याच्या पलीकडचा अर्थ समजून घेऊया.
आता 2007 साली जो शेअर बाजार वाढायला लागला आणि 21000 ह्या स्थराला पोहोचला आणि अमेरिकी बँकिंग विश्वात एक वादळ आलं, लिमन ब्रदर ही अमेरिकेतील, तत्कालीन नामांकित बँक बुडाली!
आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेत मोठा खड्डा पडला, आता साधा प्रश्न आहे, आपल्या घरात जर एखादी आर्थिक समस्या निर्माण झाली, आणि प्रचंड चणचण निर्माण झाली, तर आपण आपल्या गुंतवणुका पहिल्या काढून घेतो,कारण आपल्याला आपल्या घरातला आर्थिक खड्डा पहिला भरून काढायचा असतो!
तेच अमेरिकेनेही केले, भारत व इतर विकसनशील रराष्ट्रांच्या शेअर बाजारात लावलेला पैसा काढून घेतला, कारण त्यांना त्यांचा घरातला आर्थिक खड्डा भरून काढायचा होता.
21000 वरील शेअर बाजाराचा निर्देशांक पडायला लागून 9000 वर आला!
प्रचंड घाबराट उडाली..जो तो असतील नसतील ते शेअर विकायला लागला, ह्यात नवगुंतवणूकदार जास्त होते..
त्यांना फक्त शेअर बाजार खाली जातोय आपल्या पैशाचे कमी होणारे मूल्यकेवळ वाचवायचे होते.
ज्या लोकांनी 21000 ला खरेदी केली,त्यांनी काही दिवसात 15000 ला विकून, त्या नंतर काही दिवसात झालेला 9000 चा भाव पाहून सुस्कारा सोडला, म्हणाले ”वाचलो बाबा….शेअर बाजार सट्टा आहे, 21 हजाराचे 15 हजार झाले आठवड्या भरात,विकले नसते तर 9 हजार झाले असते, वेळीच बाहेर पडलो म्हणून वाचलो! आता नाही बाबा ह्या वाटेला जाणार!”
ह्या माणसाला 2018 साली 38000 झालेल्या शेअर बाजाराचा लाभ कसा मिळेल?
शेअर बाजार हा दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच भरगोस नफा मिळवून देतो!
हे 300 वर्षांचा इतिहासाने सिद्ध केलेले सत्य आहे.
जगप्रसिद्ध गुंतवणूक गुरू वोरेन बफे साहेबांचे तर एक तत्व आहे, ते तर म्हणतात की मी जर काही शेअर विकत घेत असिन तर किमान 5 वर्ष तरी विकत नाही!
म्हणजे काय तर जास्तकाळ शेअर बाजारात घालवा किमान 5 वर्षांचा तरी गुंतवणुक कालावधी असू द्या तेव्हा तुमचे पैसे वाढताना दिसायची शक्यता तरी आहे !
शेअर बाजारात कोणीही आजतागायत रातोरात श्रीमंत झाल्याची 300 वर्षात तरी नोंद नाही, हो रातोरात गरीब झाल्याच्या नोंदी खूप सापडतील कारण योग्य मार्गदर्शका च्या मदतीने गुंतवणूका करण्या ऐवजी टीप, वगैरे ऐकून थोड्या दिवसात भरपूर पैसे कमवायला जाणारे अनेक जण असतात.
योग्य मार्गदर्शकाच्या साहाय्याने, गुंतवणुकी चे उद्दिष्ट ठेवत, दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका केल्या तर चक्रवाढ वाढीचा फायदा होत आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करता येतात, मात्र इतकंच की योग्य वेळ साधायला जाऊ नका, अशी योग्य वेळ कधीच कोणालाच सांगता येत नाही, त्या ऐवजी शेअर मार्केट मध्ये जास्तवेळ गुंतवणूक करून राहा!
ह्या साठी उत्तम उपाय म्हणजे SIP ज्या गुंवणूकदराने गेल्या 10 वर्षात शेअर बाजार 21 हजार ते 9 हजार आणि पुन्हा 38 हजारावर असा प्रवास झाला त्या 10 वर्षात अगदी दर महिना गुंतवले असते तरी त्यावर 17% परतावा मिळाला असता, पण त्याला जो 10 वर्ष नियमित गुंतवणूक करत राहीला, त्याची प्रत्येक स्थरावर दर महिना गुंतवणूक होत गेली, दर महिना थोडे थोडे युनिट जमा होत गेले आणि 10 वर्षांनी त्या सगळ्याच युनिट चा भाव 38 हजाराच्या लेव्हल वर गेला!
छोटी पावलं, पण नियमित पावलं आर्थिक स्थैर्य मिळवून देतात!
समीर मीलन दिघे
7385807119
लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.
0 Comments